डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२५ रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये झालेल्या विशेष शिबिरात तब्बल १२५ हून अधिक रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व त्यांची टीम व डी. वाय. पाटील हॉस्पिटल सर्जरी विभाग यांनी संयुक्तरीत्या या शस्त्रक्रिया केल्या.

पद्मश्री डॉ. शरद दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालय कदमवाडी येथे नुकतेच मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, भारतीय जैन संघटना, जैन डॉक्टर्स फेडरेशन, डॉ. शीतल पाटील फाऊंडेशन, कृष्णा डायग्नोस्टिक, बी.एम.टेक स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील सर्व रुग्णांसाठी हे शिबिर घेण्यात आले.

डॉ. दीक्षित यांचे शिष्य अमेरिकेतील प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व सहकारी व रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी यांनी दोन दिवसांत २०० हून अधिक रुग्णाची तपासणी केली. यातील १२५ रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या. डॉ. अमित बसन्नावार यांनी त्यांना सहकार्य केले. डॉ. दीक्षित यांनी ४३ वर्षांत ३ लाख मोफत शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य डॉ. लाला यांच्याकडून अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूपता, व्रण, डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती अशा सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी दिली.

या शिबिराचे चेअरमन व भारतीय जैन संघटना पदाधिकारी डॉ शीतल पाटील, संघटनेचे पारसभाई ओसवाल, गिरीश कर्नावट, अभिनंदन खोत, राजकुमार शाह यांच्यासह पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते. हॉस्पिटलच्या भूलशास्त्र विभागाचे डॉ. कदम, डॉ. शीतल देसाई व सहकारी, शस्त्रक्रिया विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष- आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ आर. के. शर्मा यानी हॉस्पिटलच्या सर्व सहकाऱ्याचे अभिनंदन केले.