कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘ओपन मॅग्झीन’  या आघाडीच्या नियतकालिकाकडून २०२२ मधील उत्कृष्ट महाविद्यालयांची यादी जाहीर केली असून, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाने सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत पश्चिम विभागात देशात ६ वे स्थान मिळवले आहे.

मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, सायन्स, कॉमर्स या विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांच्या कामगिरीचा आढावा घेऊन ‘ओपन मॅग्झीन’ कडून ही यादी जाहीर केली जाते. २०२१-२२ साठीची सर्वोत्कृष्ट  महाविद्यालयांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्किटेक्चर विभागाने राष्ट्रीय पातळीवर पश्चिम विभागात ६ वा क्रमांक मिळवळा आहे. काही दिवसांपूर्वीच ‘इंडिया टुडे’ च्या यादीत महाविद्यालयाला देशात २१ वे तर ‘आउट लुक’च्या यादीत १३ वे स्थान मिळाले होते.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये स्थापन केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आर्किटेक्चर विभाग गेल्या ३७ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय डिझाईन स्पर्धेत धवल यश मिळवले आहे. १५ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक जिंकले आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दरवर्षी पहिल्या १० क्रमांकामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी स्थान मिळवत असतात.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष व आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी आर्किटेक्चर विभागाचे अधिष्ठाता प्रा. आर. जी. सावंत, विभागप्रमुख प्रा. आय. एस. जाधव व सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.