मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सायकल रॅली काढली. या रॅलीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. ही रॅली म्हणजे काँग्रेसचा मीडिया इव्हेंट आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  

फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये कर लावला आहे. नाना पटोलेंचे आंदोलन हे राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातच असावे, गुजरात किंवा इतर राज्यांनी १० रुपयांनी पेट्रोल दर कमी केले आहेत, त्याच प्रकारे महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत. अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचे श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच ही सायकल रॅली काढली आहे. काँग्रेसला देशात विरोधी पक्ष म्हणून स्थान नसल्याने काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. त्यामुळे त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच, असा टोला फडणवीसांनी लगावला.