इचलकरंजी नगरपालिकेसमोर दिव्यांगांचे चक्री उपोषण…

0
68

इचलकरंजी (प्रतिनिधी) : दिव्यांगांना मागील वर्षातील ५ टक्के निधी, कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातील सानुग्रह अनुदान, दिव्यांग उन्नती अभियानातंर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ,५ टक्के राखीव गाळे याबाबत कोणतीच कार्यवाही अद्याप  करण्यात आली नाही. या प्रलंबीत मागण्यांसाठी आज (सोमवार) सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने इचलकरंजी नगरपालिकेसमोर चक्री उपोषण करण्यात आले.

या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांनी सातत्याने विविध आंदोलने आणि निवेदन देवून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करुन दिव्यांगांच्या मुलभूत न्याय हक्काबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचे दाखवून देत आहे. ७ जानेवारीला या प्रश्नी प्रशासनाला निवेदन देवूनही याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. यासाठी आज चक्री उपोषण केल्याचे सांगण्यात आले.  यावेळी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच प्रलंबित मागण्यांबाबत लेखी पत्र मिळाल्याशिवाय चक्री उपोषण मागे न घेण्याचा इशाराही यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला.

सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे,भगवान कदम,नाना दातार, कल्लाप्पा उपासे, तुकाराम गवळी, संदीप भगत, राजेश पाटील, सुमित्रा चिचकंडे, नंदा डांगरे, सरिता शिंगारे ,सुजाता कुंभार,राखी मिणेकर यांच्यासह अन्य दिव्यांग सहभागी झाले होते.