इचलकरंजीत दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने कटरने गळ्यावर वार…

0
82

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथे दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात कटरने गळ्यावर वार केल्याने एकजण जखमी झाला. मनोज रामआशिष सिंग (वय ४६ रा. हनुमाननगर, जवाहरनगर) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी किरण गणपती काकडे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, मनोज सिंग आणि किरण काकडे हे दोघेजण मित्र असून ते एकाच प्रोसेसमध्ये कामाला आहेत. काकडे याला दारुचे व्यसन आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास काकडे हा मनोज याच्याकडे गेला आणि त्याने दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावर मनोज याने पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या काकडे याने शिवीगाळ करत हातातील कटरने मनोजच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये मनोज हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मनोज याच्या फिर्यादीवरुन काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे.