कळे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील गावांसह वाड्या – वस्त्यांवरील ग्राहकांना  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ‘मायक्रो एटीएम’ मिनी बँक म्हणून सेवा सुरू केली आहे. याबरोबरच ग्राहकांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्राहकांना अनेक आमिषे दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनेक फायनान्स कंपन्या सध्या कार्यरत आहेत. त्यांची सत्यासत्यता पडताळूनच  गुंतवणुकीबाबत ग्राहकांनी निर्णय घ्यावा, असे आवाहन नाबार्ड व कोल्हापूर  जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख दामोदर गुरव यांनी केले. 

श्री मरगुबाई महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथे जिल्हा बँकेच्या ‘मायक्रो एटीएम’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सरदार पाटील होते.

यावेळी सावर्डेचे माजी उपसरपंच संभाजी कापडे ‘मायक्रो एटीएम’च्या प्रवर्तक माधुरी प्रकाश काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास श्रीपती सातपुते, एम. एल. पाटील, बँकेचे कर्मचारी अमर पाटील, जालिंदर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जोतिराम मोरे, शहाजी पाटील, सचिव लहू पाटील, सागर बच्चे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. संभाजी कापडे यांनी स्वागत केले. सरदार काळे यांनी प्रास्ताविक केले. तर शहाजी पाटील यांनी आभार मानले.