कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात बुधवारी सकाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय (पुणे), युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (केंद्र सरकार), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई आणि राष्ट्रीय येवा योजना (शिवाजी विद्यापीठ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय येवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. प्रशांतकुमार वनंजे प्रमुख उपस्थित होते.

कार्तिकेयन म्हणाले, राज्यभरातील विद्यापीठांमध्ये सध्या ३ लाख ५४ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आहेत. त्यामधून मोजक्या ३८० स्वयंसेवकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनाच्या निवड शिबिरात सहभागाची संधी मिळालेली आहे. येथून आणंद येथील पश्चिम विभागीय शिबिरासाठी आणि तेथून राष्ट्रीय संचलनासाठी निवड केली जाईल.

राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील राष्ट्रीय येवा योजनेच्या स्वयंसेवकांची संख्या साडेतीन लाखांवरुन पाच लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात एनएसएसचे युनिट सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव अंगी बाणवल्यामुळेच जल व हरित संवर्धनाच्या कामी सातत्यपूर्ण योगदान देऊ शकलो. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी कोविड-१९ आणि महापूर काळातही शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीमधून प्रभावी भूमिका बजावल्याचे सांगितले.

क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे, उन्नत भारत अभियानाचे संचालक डॉ. टी.आर. पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, मंगेश खैरनार, रमेश देवकर, कारखानीस, कॅप्टन प्रशांत पाटील, राहुल मगदूम, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, संदीप पाटील, डॉ. उमाजी पाटील व डॉ. स्नेहल राजहंस उपस्थित होते. प्रास्ताविक यांनी केले. कार्यक्रमास राज्यभरातील २९ विद्यापीठांचे २८० एनएसएस स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.