कोल्हापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत खरीप हंगामातील पेरणीसाठी अनुदानावर बी बियाणे देण्याचे नियोजन केले आहे. मात्र, यासाठी असणारी आँनलाईन नोंदणीची जाचक अट रद्द करावी. अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी कृषी विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन कागल कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या ग्रामीण भागात वीजेचा लपंडाव सुरू असून सर्वर डाऊनही होत आहे. त्याचबरोबर लाँकडाऊनमुळे महा ई सेवा केंद्र, नेटकँफे बंद आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणांची अॉनलाईन मागणी करायचे कोठे ? हा प्रश्न आहे. त्यामुळे आँनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारुन शेतकऱ्यांना बियाणे वाटप करावे.तसेच,यापुढे कर्नाटकच्या धर्तीवर मे महिन्यातच आणि सातबारानुसार बियाणे मिळावे अशी मागणी भोकरे यांनी केली आहे.

तसेच आँनलाईनची जाचक अट रद्द करून कृषी सहायक,तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत आँफलाईन पद्धतीने मागणी अर्ज स्वीकारुन या योजनेचा लाभ द्यावा. खतांची टंचाई दाखवून जे विक्रेते चढया भावाने खतविक्री करणाऱ्या दुकानदारांवरही भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात भोकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी कागल कृषी विभागाचे सहाय्यक अधिक्षक आर. एस. फडतारे, ए. बी पाटील, व्ही. बी. खोत आदी उपस्थित होते.