भुदरगड तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ…

0
559

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील वाघापूरसह व्हनगुती, श्रीनगर, मुदाळच्या शिवारात चार गव्यांनी धुडगूस घातला. यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अचानकपणे गव्यांचा कळप शिवारात दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून वनविभागाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

आज (गुरुवार) पहाटे ऊस तोडणी मजूर आणि शेतकऱ्यांना व्हनगुती येथील सतिश चौगले यांच्या मक्याच्या रानात गव्यांचा कळप पिकाची नासधूस करताना दिसला. त्यांनी या गव्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु गव्यांनी त्यांना दाद दिली नाही. हे गवे वाघापूर परिसरात दाखल झाल्याचे समजताच लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे बिथरलेले गवे सैरावैरा पळू लागले. यावेळी व्हनगुत्तीच्या सरपंच आणि पोलीस पाटलांनी लोकांना आवरण्याचा प्रयत्न केला.

आज सकाळी साडे नऊच्या सुमारास हे गवे मुदाळ डोंगराच्या दिशेने धुम ठोकली. यावेळी ऊस, मका, भुईमूग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या पिकांचे पंचनामे करून शासनाने त्याची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सुनिल खंटागळे यांनी केली आहे.