नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  वॉशिंग्ट्न विमानतळाबाहेर अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी आज (गुरूवार) जंगी स्वागत केले. बरसणाऱ्या पावसाच्या सरीत मोदी यांच्या समर्थनात घोषणा देत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भर पावसात शेकडो भारतीयांनी  स्वागतासाठी गर्दी करत मोदींशी हस्तांदोलन करत त्यांच्याशी संवाद साधला.

वॉशिंग्टन विमानतळाबाहेर माझे स्वागत करणाऱ्या सर्वांचे मी आभारी आहे. अनिवासी भारतीय ही आमची ताकद आहेत. अनिवासी भारतीयांनी जगभरातील विविध देशांमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे, असे ट्विट मोदींनी केले आहे.

पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. यावेळी उभय देशांमधील विविध मुद्द्यांवर विशेष करुन विज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदी शिखर परिषदेत सहभागी होणार असून शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. तसेच ते पाच बड्या कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर क्वा्ड देशांच्या शिखर परिषदेसाठी अमेरिकेत आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचीही मोदी भेट घेणार आहेत.