कळे (प्रतिनिधी) :  जुलै महिन्यात झालेल्या महापुरामुळे धामणी नदीकाठावरील शेकडो एकर पिकांना मोठा फटका बसला आहे.  भात आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच महापुरामुळे शेती पंपाला वीज पुरवठा करणारे वीज खांब पडल्याने सध्या शेती पंपाचा वीज पुरवठा बंद आहे. पण सध्या वीज नसल्याने शेतीसाठी पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी उरलासुरला पूरबाधित ऊस व माळरानावरील ऊस पिके वाळू लागली आहेत. याकडे  महावितरण लक्ष  कधी देणार ? अशा संतप्त प्रतिक्रिया धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांतून येऊ लागल्या आहेत.

गेल्या १५ ते २० दिवसापासून परतीच्या पावसाने पूर्णता विश्रांती घेतल्याने नदी काठासह माळरानावरील ऊस पीक पाण्याअभावी वाळत आहे. महापुरामुळे विजेचे खांब, विद्युत वाहिन्या, ट्रांसफार्मर जमीनदोस्त झाले आहेत.

गेल्या महिन्याभरापासून महावितरण कडून कोसळलेली विद्युत यंत्रणा उभी करण्याचे काम सुरू आहे. कळे महावितरण अंतर्गत म्हासुर्ली ते कळे दरम्यान  महापुरामुळे धामणी नदीच्या काठी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या शेतीतील विद्युत खांब कोसळले  आहेत. अनेक ट्रांसफार्मर खराब झाले आहेत. परिणामी महावितरणचे सुमारे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अद्यापही धामणी नदीकाठावरील अनेक भागातील शेतात विद्युत वाहिन्या व खांब शेतशिवारात पडलेल्या स्थितीतच आहेत. विजेअभावी पाणी नसल्याने ऊस पिकाला पाणी व नवीन ऊस लावणीची कामे खोळंबली आहेत. तर पाण्याअभावी रब्बी हंगाम देखील पुढे जाण्याची शक्यता आहे. विजेअभावी हातातोंडाशी आलेला ऊस वाढत असताना महावितरणकडून मात्र शेती पंपासह व इतर घरगुती बिलांच्या वसुलीचा तगादा लावला जात आहे.

वादळी वारे व महापुरामुळे कोसळलेले विद्युत खांब ट्रांसफार्मर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी धामणी खोऱ्यातील तीन कॉन्ट्रॅक्टर व मजूर कामाला लावले आहेत. धामणी नदीकाठची कोलमडलेली वीज वितरण यंत्रणा ६० टक्के उभारली असून येत्या १० ते १२ दिवसात विद्युत जोडणीचे काम पूर्ण होईल.

– एस. पी. पाटणकर,  उपकार्यकारी अधिकारी (महावितरण उपविभाग, कळे)

उसाला पाणी देण्यासाठी मोटर पंप नदीकाठावर बसवले आहेत. पण वीज नसल्याने उभे पीक डोळ्यादेखत वाळत आहे. कळे महावितरण विभागाने येत्या ८ दिवसांत शेतीपंपाची वीज सुरू न केल्यास महावितरण कार्यालयासमोर परिसरातील  शेतकरी  आंदोलन करणार आहोत.

– कृष्णात बाबू दळवी,  शेतकरी (वेतवडे)