तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी : ना. हसन मुश्रीफ

0
471

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिकस्थिती दिवसेंदिवस भक्कम होत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असा आग्रह नेहमी संचालक आणि आमदार पी. एन. पाटील बोर्ड मिटींगमध्ये धरतात. त्यांच्या आग्रहामुळेच बँकेतर्फे आता तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री आणि बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली. ते बँकेच्या ई लॉबी भूमीपूजन, मोबाईल व्हॅन, मायक्रो एटीएम, यूपीआय सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, नाबार्डचे अधिकारी नंदू नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. हसन मुश्रीफ म्हणाले की, अनेक अडचणीवर मात करत बँक आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आता एक लाखांपर्यंतच्या पीक कर्जास दोन टक्के व्याज आहे. त्यामध्ये बदल करून तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्ज बिनव्याजी देण्यात येईल. सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यातून नियमित कर्ज परफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केले जाईल. साखर कारखानदारी अडचणीत असताना केंद्र सरकार मदत करण्याकडे दूर्लक्ष करीत आहे. भविष्यात कारखानदारी मोडीत निघाल्यास केंद्रीय अन्न व नागरी मंत्री पियूष गोयल कारणीभूत राहतील, असे ना. मुश्रीफ म्हणाले.

या कार्यक्रमास माजी खासदार आणि संचालिका निवेदिता माने, उदयानी साळुंखे, भैय्या माने आदी संचालक अधिकारी उपस्थित होते.