शिरोळ येथील नदीत मृत मासे खाण्यासाठी मगरीचा वावर

0
77

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : शिरोळ येथील पंचगंगा नदीत मासे मरण्याच्या प्रमाणात आता दुप्पटीने वाढ झाली आहे. हेच मृत मासे खाण्यासाठी नदीमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. रविवारी दुपारीसुद्धा नदीमध्ये मगरी मृत मासे खात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिरोळ बंधाऱ्यात मृत माशांचा अक्षरशः खच पाहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत जलआंदोलन केले आहे. मात्र, काही केल्या पंचगंगेतील प्रदूषण थांबले नाही. आजही मृत माशांचा खच लागल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पाणी पुरवठा विभागामार्फत मृत मासे बाहेर सुद्धा काढले जात आहेत. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. मृत मासे खाण्यासाठी मगरींचा वावर सुरू असल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.