कोल्हापूर (प्रतिनिधी) : भविष्य निर्वाह निधीच्या प्रस्तावावर वरिष्ठांची सही घेऊन प्रकरण लवकर मंजूर करण्यासाठी निवृत्त सहायक शिक्षकाकडे २३ हजार रुपयांची लाच देण्याची मागणी करणाऱ्या वरिष्ठ लिपिकावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम बळवंत कांबळे (रा. टाकवडे वेस, इचलकरंजी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

संशयित आरोपी उत्तम बळवंत कांबळे हा शिक्षण उपसंचालक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त सहायक शिक्षक असून, त्यांच्या फंडाची रक्कम मिळण्याकरिता त्यांनी किणी हायस्कूलकडे अर्ज दिला होता. या अर्जावर प्रस्ताव करून तो कोषागार कार्यालय येथे पाठविण्यात आला.

याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित शिक्षकाने शिक्षण उपसंचालक कार्यालयात भविष्य निर्वाह निधीचे कामकाज पाहणाऱ्या वरिष्ठ लिपिक उत्तम कांबळे याच्याशी संपर्क साधला. भविष्य निर्वाह निधीबाबतचे काम लवकर पूर्ण कोषागार कार्यालयाकडे पाठवण्यासाठी उत्तम कांबळे याने सुरुवातीस २५ हजार लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीनंतर २३ हजार देण्याचे निश्चित करण्यात आले. दरम्यान, सहायक शिक्षकाने याबाबत २२ ऑगस्ट रोजी  लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकदे तक्रार अर्ज दिला होता. याची पडताळणी २३ ऑगस्ट रोजी करण्यात आली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्यातील पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहायक फौजदार संजीव बंबरगेकर, हे. कॉ. शरद पोरे, विकास माने, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कॉ. रुपेश माने यांनी या कारवाईत भाग घेतला होता.