पुणे (प्रतिनिधी) : मुलाच्या लग्न  समारंभात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय महाडिक यांच्यासह लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि मॅनेजर निरुपल केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ  पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे.

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल रविवार (दि.२१) पार पडला. या सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. अनेक नेत्यांसह हजारांहून अधिक नागरिक विवाह समारंभात सहभागी झाले होते.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देण्यात आली होती. पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांच्या लग्नाला शंभरपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित होते. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क घातले नव्हते.