करवीर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश डावलून गांधीनगर मुख्य रस्त्याच्या ४७ मीटरच्या आत अवैध बांधकाम केल्याप्रकरणी सहाजणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशन पंजवानी, मुकेश अहुजा, गोपालदास दर्यानी (तिघे रा. गांधीनगर) व सुहास देवणे, शरद शांतिनाथ चौगुले व अरुण शांतिनाथ चौगुले (सर्व रा. वळीवडे ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

तावडे हॉटेल ते रुकडी बंधारा हा गांधीनगरचा मुख्य रस्ता म्हणजे जिल्हा मार्ग क्रमांक २० असून या रस्त्याच्या दुतर्फा सत्तेचाळीस मीटरच्या आत कोणीही नवीन बांधकाम करण्याचे नाही तसेच झालेली बांधकामे ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १० मे २०१९ रोजी दिला आहे. तरीही वरील सहा मिळकतधारकांनी अवैध बांधकाम केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची फिर्याद सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी इंगवले यांनी दिली.