कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथील बेकायदेशीर पॅरीश हॉलचे बांधकाम बंद करण्यासाठी काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिक आणि शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह सुशील भांदिगरे, रेव्हरंड गोगटे, संजय आवळे, संदीप आवळे, अरुण खोडवे, संजय महाजन, अबिगेल भोसले, सौ. शैला बिरांजे (सर्व रा. डी वार्ड, ब्रह्मपुरी) तसेच इतर ५० ते ६० जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जीवन दत्तू आवळे (वय – ५०, रा. शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी जीवन आवळे ब्रह्मपुरी येथील ट्रस्टच्या ऑफिसमध्ये काम करत असताना शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह सदरचे नमूद संशयित व्यक्तींनी ऑफिसमध्ये येऊन सदरचे ऑफिस हे ट्रस्टच्या मालकीचे नसून ब्रह्मपुरी चर्चच्या मालकीचे आहे. तसेच येथे सुरू असलेले पॅरीश हॉलचे काम बेकायदेशीर आहे या कारणावरून गोंधळ घातला. आणि जीवन आवळे याला बाहेर काढून ऑफिसला कुलूप लावले. त्यामुळे जीवन आवळे यांनी या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.