कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्त्यांनी ३६ रिक्षांद्वारे रविवार १४ मार्च रोजी दुपारी कोल्हापुरात रॅली काढली होती. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल या सर्वांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पारित केलेल्या आदेशानुसार सामाजिक, राजकीय कार्यक्रम, रॅली, मोठ्या प्रमाणात होणारे विवाह सोहळे, सभा, मोर्चे, आंदोलने अशा कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. परंतु आम आदमी पार्टीतर्फे १४ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास कोल्हापुरात रॅली काढण्यात आली. त्यामुळे संदीप देसाई यांच्यासह सुमारे १०० पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.