कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या जगभरात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे वारे असून, विश्वविजेतेपदासाठी अनेक संघ कतार येथे घाम गाळत आहेत. संघासोबतच त्यांच्या समर्थकांचा आणि चाहत्यांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.

कोल्हापुरातील प्रत्येक संघाचा चाहता वर्ग असून, गल्लोगल्ली लागलेले विविध फुटबॉल खेळाडूचे भव्य फलक, ठिकठिकाणी मॅचच्या वेळी लावण्यात येणारे स्क्रीन कोल्हापूरच्या फुटबॉल वेडाची साक्ष देत आहेत.

कोल्हापूरचे फुटबॉल प्रेम जगजाहीर करण्याच्या उद्देशाने कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी त्यांचे सहकारी सार्थक खतोडिया, भारत मार्कल, सुनील मार्कल, केदार शेळके यांच्यासोबत एका सामन्यादरम्यान ‘क्रिकेट वेड्या देशातील फुटबॉल वेडे कोल्हापूर’अशा आशयाचा आणि कोल्हापुरातील विविध तालमींच्या संघांचे लोगो असलेला फलक स्टेडियममध्ये झळकावून सर्वांचे लक्ष वेधले.