कागल (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात शाहू साखर कारखान्याचा लौकिक पोहोचला  आहे. कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. या यशाचे सभासद शेतकरी हेच मानकरी आहेत, असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंहराजे घाटगे यांनी केले. नंदगाव व इस्पुर्ली सेंटरच्या सभासदांच्या ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी शाहू कारखान्यास व्ही.एस. आय पुणे यांचा ऊस विकाससाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल समरजितसिंहराजे घाटगे व शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या संचालिका सुहासिनीदेवी घाटगे यांचा  सभासदांच्या वतीने सत्कार केला. राजाराम पाटील व विजूताई बोडाके यांनी मनोगत व्यक्त केले.

घाटगे पुढे म्हणाले की, कारखान्याचे दिवंगत संस्थापक चेअरमन विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासद शेतकऱ्यांचे कल्याण व भागाचा कायापालट केला आहे. सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर हीच परंपरा मी पुढे चालवित आहे. याचा मला अभिमान आहे.

यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. ऊस विकास अधिकारी के. बी. पाटील यांनी स्वागत केले. संचालक भूपाल पाटील यांनी आभार मानले.