कागल येथे ऑनलाईन शिक्षणासाठी अत्याधुनिक डिजिटल स्टुडिओची निर्मिती…

ना. हसन मुश्रीफ साहेब करणार उद्या उदघाटन : राज्यातील पहिला प्रयोग

0
168

कागल (प्रतिनिधी) : कोविडच्या प्रादुर्भावामुळे याही शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘डिजिटल पध्दतीने’ झाली आहे. तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या दीप फाऊंडेशनने मराठी शाळांसाठी ‘ऑनलाइन शाळा’ नावाचा प्लॅटफॉर्म विकसित केला. मात्र यातील काही त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले. त्यावर उपाय म्हणून दीप फाउंडेशनने ‘ऑनलाइन शाळा’ या उपक्रमास ‘ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची जोड दिली आहे. त्याअंतर्गत ना. हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षण विभाग, पंचायत समिती कागलच्या सहकार्याने दीप फाऊंडेशनने कागल येथे अत्याधुनिक लेक्चर कॅप्चर स्टुडिओची निर्मिती केली आहे. त्याचे उद्घाटन उद्या (शनिवार) ना. मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड

‘ऑनलाइन शाळा’ हा राज्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्रशासकीय अधिकारी यांना जोडणारा अँड्रॉइड प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मदतीने अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन, पूरक अध्यापन, स्वयंअध्ययन तसेच शाळा व्यवस्थापन या सर्व गोष्टी ऑनलाइन पद्धतीने यशस्वीरित्या राबवता येतात, हे सिद्ध झाले आहे कागल तालुक्यातील तसेच पारनेर, नगर व कर्जत -जामखेड या तालुक्यातील ४२ हजार सरकारी शाळेतील विद्यार्थी ‘ऑनलाइन शाळा’ या सॉफ्टवेअरच्या मदतीने शिक्षण घेत आहेत. परंतु ज्या शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापनात रुची नाही किंवा जे शिक्षक स्वतंत्र डिजिटल लेसन प्लॅन तयार करण्यात असमर्थ आहेत त्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांचे वर्षभरात शैक्षणिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून ही संकल्पना मांडण्यात आली.

सदर स्टुडिओ मध्ये मराठी व सेमी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ॲक्च्युअल टीचिंग ई-लर्निंग कन्टेन्ट बँक बनवली जात आहे. यासाठी कागल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गणपती कमळाकर यांच्या मार्गदर्शनखाली ६० विषयतज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सदर शिक्षकांना स्टुडिओमधील तांत्रिक साधनाच्या मदतीने प्रत्यक्ष अध्यापन कसे करायचे याबाबतचे प्रशिक्षण संदीप गुंड यांनी नुकतेच दिले असून ॲक्च्युअल टीचिंग ई-लर्निंग कन्टेन्ट व्हिडिओ निर्मितीस सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनेट शिवाय या ॲक्च्युअल टिचिंग ई-लर्निंग कन्टेन्ट बँक चा ॲक्सेस मिळणार असल्याने विद्यार्थी शिकण्यासाठी फक्त त्यांच्या वर्गशिक्षकांवर अवलंबून राहणार नाही.

अत्याधुनिक सेंट्रालाइज स्टुडिओ मधून दर्जेदार डिजिटल शिक्षण देण्यासाठी नामांकित कंपन्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतात. परंतु दीप फाऊंडेशनने त्याच प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर व  रिसोर्सेस ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले आहेत. ‘ऑनलाईन शाळा व्हर्च्युअल अकॅडमी’ चे उदघाटन शनिवार २१ ऑगस्ट रोजी ना. मुश्रीफ यांच्या हस्ते कागल येथे करण्यात येणार आहे.

स्मार्ट फोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पुरेशी इंटरनेट कनेक्टिविटी व विद्युत लोडशेडिंग या समस्यांमुळे १००% विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण पोहचणे शक्य होत नव्हते. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उपकरण, इंटरनेट आणि विद्युत या समस्यांवर दीप फाऊंडेशने नाविन्यपूर्ण उपाय शोधला आहे. इंटरनेट आणि विजेशिवाय चालणाऱ्या पोर्टेबल डिजिटल लर्निंग किटची निर्मिती केली आहे. त्याचेही उद्घाटन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे.