कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : सर्वांनाच परिचित असलेल्या सराफ बाजारातून म्हणजेच आपल्या गुजरीतून एक बंगाली कारागीर आणि एक चांदी मूर्तिकार असे दोघे जण गेल्या काही दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे गुजरीतील सराफ व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. खळबळ उडाली असली तरी याप्रकरणाबद्दल अडचणीत आलेल्या सराफांनी आळी मिळी, गुपचिळीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलिसांपर्यंत हे प्रकरण अद्यापपर्यंत पोहचलेच नाही.

गुजरीत अनेक बंगाली कारागीर दागिने घडणावळीचे काम करतात. हा प्रकार गेली अनेक वर्षे सुरू आहे. कुठलीही चिट्ठी चपाटी न घेता केवळ विश्वासावर हा व्यवहार चालतो. अनेक बंगाली कारागीरांनी सराफांच्या विश्वासघात केल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. पण, शहाणपण अजूनही सुचत नाही. कमी मोबदल्यात कारागीर मिळतो, म्हणून हीच परंपरा अजूनही कायम आहे.

असाच आणखी एक बंगाली कारागीर गेल्या काही दिवसांपासून गायब झाला आहे. त्याच्याकडे पाच पंचवीस सराफांनी सोने दिले आहे. दागिने तयार करून  आणून देणे तर सोडाच, नेलेले सोनेही परत न करता हा कारागिर गायब झाल्याने अनेकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

सराफ संघाच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने या कारागिराला कोल्हापुरात आणल्याची चर्चा गुजरीत दबक्या आवाजात सुरू आहे. या कारागिराचा मोबाईलही बंद असल्याची चर्चा आहे. कारागीर गायब होऊन काही दिवस झाले तरी एकाही सराफाने त्याबद्दल पोलिसात तक्रार दिली नाही हेच खरे गौडबंगाल आहे.

राधानगरी तालुक्यातील काही युवक चांदीच्या मूर्ती बनवण्याचे काम करतात. त्यांची संख्या दोन अडिचशेच्या आसपास आहे. हे सर्वजण सानेगुरुजी वसाहत परिसरात बंगले भाड्याने घेऊन सराफांकडून चांदी आणून त्यांच्या ऑर्डरप्रमाणे मूर्ती बनवून देतात. हा व्यवहारही विश्वासावर चालतो. असाच एक मूर्तिकार गेल्या काही दिवसांपासून गायब झाला असून त्याच्याकडेही अनेक सराफांची लाखो रुपयांची चांदी अडकली आहे. हा कारागीर जिल्ह्यातच आहे. पण, त्याचाही मोबाईल बंद असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने काही जण त्याच्या घरी जाऊन थडकले. पण, तो सापडत नाही.

हा मूर्तिकार एका प्रकरणात अडकल्याने त्याने सराफांची चांदी विकून प्रकरण मिटवल्याची चर्चा आहे. एका सराफाने त्याला गाठून चांदी परत देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो दुकानात आलाही. पण, संबंधित मालक दुकानात नव्हता. त्यामुळे त्याने संपर्क करून चांदी आणल्याचे सांगितले. सराफ बाहेर असल्याने आणलेली चांदी दुकानातील कामगारांकडे दे असे सराफाने सांगितले. त्याप्रमाणे तो गठळे दुकानात ठेवुन गेला. पण, सराफाने दुकानात परत येऊन गठळे तपासून घेतल्यावर त्यात चांदी ऐवजी तांब्याच्या पट्ट्या असल्याचे आढळून आले.

इतके सारे रामायण गुजरीत घडून सुद्धा संबंधीत सराफांच्यामध्ये मात्र आळी मिळी गुपचिळी का आहे ? हे मात्र न उलगडणारे कोडे आहे.