कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सीपीआर, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी आणि उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज रुग्णालयातील ऑक्सिजनमध्ये वाढ करण्यात येणाऱ्या पुरवठा यंत्रणेचे सुरक्षा ऑडीट करण्यासाठी (ऑक्सीजन सिक्युरिटी ऑडीट) जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तीन समित्या नियुक्त केल्या आहेत.

समितीस रुग्णालयात बसविण्यात आलेल्या जुन्या आणि नविन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची सुरक्षा तपासणी करणे, ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा जसे की, गॅस पाईपलाईन, गॅस प्लँट, गॅस आऊटलेट यांची वेळेवेळी पहाणी, त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालयास सूचना देणे तसेच रुग्णालय प्रमुखांकडून अमलबजावणी करुन घेणे. ऑडीटमध्ये ज्या त्रुटी आढळल्या आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक नियमावली निश्चित करणे व उपाययोजना सुचविणे आणि त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित रुग्णालय प्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांच्याकडून  त्रुटी पूर्तता करुन घेणे.

आवश्यकतेप्रमाणे खासगी यंत्रणेकडून सल्ला आणि अंमलबजावणी करुन कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समितीने ७ दिवसांत अहवाल सादर करावा. सुचविलेल्या उपाययोजनांबाबत अंमलबजावणीही करावी. समितीचे कामकाज आणि पत्रव्यवहार तसेच इतर प्रशासकीय व तांत्रिक कामासाठी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जबाबदार राहतील. समिती मार्फत सुचविण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाय योजनांची कामे करणे, अंदाज पत्रके तयार करणे, निविदा मागविणे व काम करुन घेण्यासाठी समितीस अधिकार प्रदान करण्यात येत आहे. समितीच्या मान्यतेनंतर संबंधित समिती अध्यक्ष, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम व यांत्रिकी मंडळ यांना निविदा मागविणे व पुढील काम करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.