टोप (प्रतिनिधी) : पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज कोविड लसीकरण ड्राय रन प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी सर्वसामान्यांसाठी लस उपलब्ध झाल्यानंतर कशा पद्धतीने लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे, याबाबतची माहिती देण्यात आली.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात आज कोविड लसीकरण ड्राय रन प्रात्यक्षिक पार पडले. शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या प्रात्यक्षिक प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, हातकणंगले पंचायत समिती आरोग्य अधिकारी सुहास कोरे, शिरोली केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युज, ए.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून लसीकरण, लसीकरणानंतरची आरोग्य तपासणी वगैरे माहिती देण्यात आली.

या वेळी आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.