कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळासाठी अतिरिक्त ६४ एकर जमीन संपादन करण्यासाठी गुरुवारपासून गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील जमिनीची मोजणी होणार असून ती शनिवार (ता. १२) अखेर होणार आहे.

उपअधीक्षक भूमिअभिलेख करवीर यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीची मोजणी होणार आहे. याबाबत  जमीन मोजणीच्या पंधराशेहून अधिक खातेदारांच्या नोटिसा तलाठी कार्यालय मुडशिंगी येथे प्राप्त झाल्या. २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९१, ३२२, ३२३, ३२४,  ३२६ अ, ३२७ या सर्व्हे नं. मधील खातेदार यांना मोजणी नोटिसा आलेल्या आहेत. नेमक्या कोणत्या मिळकती विमानतळ विस्तारीकरणाच्या अतिरिक्त भूसंपादनामध्ये जाणार याची स्पष्टता उद्या होणार आहे. प्रशासनाकडून मोजणीची तयारी झाली असून मोजणी दरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून त्यासाठी सर्व खातेदारांनी सहकार्य करावे असे आवाहन गडमुडशिंगीच्या मंडल अधिकारी अर्चना गुळवणी यांनी केले आहे.

विस्तारीकरणामधील नोटीस प्राप्त पंधराशे प्रकल्पग्रस्तांपैकी बहुतांश प्रकल्पग्रस्तांना आपली मिळकत विस्तारीकरणात समाविष्ट होते की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. या जमिनींचा मोबदला कसा जाहीर होतो यावर भूसंपादनाला विरोध करावयाचा की नाही, याचा फैसला होणार असल्याने खातेदारांनी ‘वेट अँड वॉच’ भूमिका घेतली आहे.