कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील तक्रारदाराकडून स्टोन क्रेशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी ११ लाखांची मागणी करुन साडेपाच लाखांची लाच घेताना फराळे येथील सरपंच संदीप डवर आणि प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांना काल अटक केली होती. आज (सोमवार) त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

राधानगरी तालुक्यातील क्रशर स्टोन व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडून प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान यांनी ११ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे यासंदर्भात तक्रारादाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार कोल्हापुरात सापळा लावून एसीबीच्या पथकाने काल मध्यवर्ती प्रशासकीय  इमारतीत सरपंच संदीप डवर याच्याकरवी पहिल्या टप्प्यातील साडेपाच लाखांची लाच घेताना प्रांताधिकारी प्रसेनजीत प्रधान आणि सरपंच डवर याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रधान यांच्या घराची (रा. प्लॉट नं. ३०३, सी विंग, विंड गेट अपार्टमेंट, न्यू पॅलेस, कोल्हापूर) इथे पोलीसांनी झाडाझडती घेतली. यावेळी प्रधान याच्या घरातून ९ लाख १३ हजार इतकी रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्रधान याने या रकमेचा खुलासा न दिल्याने ही रक्कम पोलीसांनी जप्त केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.