यंदाही टोप येथील बिरदेव जळ यात्रेवर कोरोनाचे सावट

0
1125

टोप (प्रतिनिधी) : धनगर समाज आणि खाटीक समाजाचे आराध्य दैवत असलेल्या   टोप (ता. हातकणंगले) येथील श्री बिरदेवाच्या त्रैवार्षिक जळ यात्रेवर यंदाही कोरोनाचे सावट आहे. श्री बिरदेवाची त्रैवार्षिक जळ यात्रा गुढीपाडव्यापासून ५ दिवस भरणार आहे. परंतु कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता ही यात्रा रद्द होण्याची शक्यता असल्याने बिरदेव भक्तांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा येथील भक्तगण जळ यात्रेस मोठ्या प्रमाणात येत असतात. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे श्री बिरदेव यात्रा रद्द करण्यात आली होती. तीन वर्षाने येणारी जळ यात्रा यंदा भरणार होती. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे यात्रा, लग्न सोहळे आदी कार्यक्रमावर निर्बंध लावले जात आहेत. मंदिरांच्या दर्शन वेळेबाबतही कडक निर्बंध लावले जात आहे. परिणामी बिरदेवाची जळ यात्राही रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिरदेव भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.

दरम्यान, यात्रा रद्द झाली तरी, शासन नियमानुसार धार्मिक कार्यक्रम, जळाचा कार्यक्रम, पूजाअर्चा पारंपरिक पध्दतीने मोजक्या पुजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती बिरदेव देवस्थानकडून देण्यात आली  आहे.