कोरोनाचा नवीन स्ट्रेन : संशोधकांनी दिली दिलासादायक माहिती   

0
263

मुंबई (प्रतिनिधी) : जगातील काही देशात लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन सापडल्याने पुन्हा एकदा जगभरात  चिंतेचे वातावरण पसरले आहे. परंतु संशोधकांनी एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. मानवी शरीराला व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यात अनेक बदल होत असतात. हे अनपेक्षित नाही. आणि त्यामुळे चिंता करण्याचीही आवश्यकता नाही, असे संशोधकानी म्हटले आहे.   

वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, अनेक कोरोना प्रतिबंधक लशींची निर्मिती आधीच अँटीबॉडीज निर्मितीच्या उद्देशाने केली आहे. या अँटीबॉडीज कोरोना व्हायरसमधील स्पाइक प्रोटीनवर हल्ला करतील. लस स्पाइकमधील वेगवेगळया भागांना लक्ष्य करते. त्यामुळे व्हायरसमध्ये एखादे परिवर्तन झाले म्हणून लस उपयोगी ठरणार नाही, असे म्हणता येणार नाही.

सीएसआयआर महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणाले की, लसीमध्ये अँटीबॉडीज सारखा काही पैलूंमध्ये फरक असू शकतो. पण म्हणून लस निष्क्रिय ठरेल असा अर्थ काढू शकत नाही. व्हायरसमध्ये परिवर्तन झाले, तरी लस तितकीच प्रभावी ठरु शकते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.