दुसर्‍या टप्प्यात पत्रकारांना कोरोना लस दया : बाजीराव फराकटे  

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीत सर्वच पत्रकारांनी काम केलेले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता काम केले आहे. यामुळे काही पत्रकारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पत्रकारदेखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून या काळात होते आणि आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पत्रकारांचेही लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष तथा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाजीराव फराकटे यांनी  केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई व जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती यु. डी.कुंभार यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की,  दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणजेच पोलीस, फायर ब्रिगेड, सफाई कर्मचारी, महापालिका कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांना लसीकरण करणार  असल्याची माहिती  मिळत आहे. आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरीत नागरिक आणि कोमॉर्बिड व्यक्तींचा समावेश केल्याचे समजते. परंतु   पत्रकारांचे लसीकरण दुसऱ्या टप्प्यातच करण्यात यावे. यामध्ये दैनिक, साप्ताहिक,  टीव्ही चॅनेल,  युट्युब, मासिक अशा विविध आवृत्ती आणि डिजिटल मीडियामधील संपादक,  उपसंपादक, अधिकारी, कर्मचारी, पायलट, वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबांचा समावेश करावा.

राज्यात लसीकरणासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचे  आणि टास्क फोर्सचे गठन केले आहे. तसेच राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार केली आहे. जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत शहरांमधील टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत वॉर्ड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात निती आयोगाअंतर्गत कोविड-१९ लसीकरणासाठी प्रशासनातील राष्ट्रीय तज्ञ गटही केंद्र स्तरावरील समिती देशभरातील लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहेत. तरी  लसीकरणाचे नियोजन उत्तमरित्या केले असून पत्रकारांनाही दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.