नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना लसींच्या आपात्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने संमती दिली आहे. तर या लसींवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे नपुंसकत्व येते, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते आशुतोष सिन्हा यांनी केला आहे. यावर डीसीजीआयचे व्ही. जी. सोमानी यांना खुलासा करून या आरोपांचे खंडन केले आहे. आज (रविवार) आयोजित केलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

नपुंसकत्व येणाऱ्या लसीला आम्ही कधीही परवानगी देणार नाही. या दोन्ही लसी १०० टक्के सुरक्षित आहेत. लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येते, असे म्हणणे साफ चुकीचं आहे. अशा मूर्खपणाच्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये, असे सोमानी यांनी स्पष्ट केले. सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत, असेही सोमानी यांनी सांगितले.