टोप (प्रतिनिधी) : सर्वत्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी टोप (ता. हातकणंगले) येथे आज (बुधवार) ग्रामपंचायत कार्यालयात गावातील प्रमुख नागरिकांची बैठक घेण्यात आली. या वेळी दक्षता समितीची पुनर्स्थापना करण्यात आली.

या बैठकीत गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी लसीकरण करून घेण्यास सांगून जे लस घेणार नाहीत अशा ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमधील दाखले, तलाठी कार्यालयातील उतारे व इतर कागदपत्रे तसेच रेशन धान्यही देण्यात येऊ नये. ज्यांनी लसीकरण केले आहे त्यांनाच देण्यात यावे. जे व्यावसायिक लस घेणार नाहीत,  व्यवसायधारकांनी आपले व्यवसाय बंद ठेवावे, अशा सूचना देण्यात येणार आहेत. परजिल्हयातुन आलेल्या नागरिकांना काही दिवस क्वारंटाईन राहून काळजी घ्यावी. गावात कोणतेही मोठे कार्यक्रम होणार नाहीत, यांची काळजीही दक्षता समितीने घ्यायची आहे. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असेल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

या वेळी सरपंच रुपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, तलाठी जयसिंग चौगले, पांडुरंग पाटील, राजू कोळी, पोलीस पाटील महादेव सुतार, विनोद पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते, रेशन धान्यधारक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.