मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून सक्रीय रूग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीत कोरोना निर्बंधामध्ये  शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) वर्षा निवासस्थानी टास्क फोर्सच्या सदस्यांसोबत चर्चा केली.  

यावेळी राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले. पार्क्समधील पाण्यातील राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येणार असून अम्युझमेंट पार्क, चित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवागी देण्यात आली. त्याचबरोबर राज्यात डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने हळूहळू निर्बंध शिथिल केले आहेत. २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी लहान मुलांच्या टास्क फोर्सचे सदस्यदेखील उपस्थित होते.