कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना आणि ओमायक्रोनला कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. याचा सर्वात जास्त फटका क्रीडा क्षेत्राला बसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शासनाने जेंव्हाजेंव्हा निर्बंध कडक केले तेव्हा तेव्हा क्रीडा क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. तरी शासनाने पन्नास टक्के क्षमतेने जे खेळ बॉडी कॉन्टॅक्टमध्ये नाहीत त्या खेळांना किमान परवानगी  द्यावी. अशी मागणी स्पोर्ट्स पेरेंट्स असोशिएनचे अध्यक्ष स्वप्निल पार्टे यांनी केली आहे.

पार्टे म्हणाले की, इतर क्षेत्रातील मॉल, सिनेमागृहे, बसेस, ट्रेन, बाजारपेठा आणि अन्य क्षेत्रांचा विचार करून प्रत्येकाला थोडीफार सूट देते. पण यामधून क्रीडाक्षेत्र नेहमीच वगळण्यात आले आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक घडामोडीवर त्याचा  परिणाम होत आहे. क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खाजगी शिक्षक आणि क्रीडाशिक्षक खाजगी शाळांमधील कर्मचारीवर्ग यांना शासनामार्फत कोणतीही मदत किंवा निधी प्राप्त झाला नाही.

आताही शासनाने सरसकट सर्व खेळ जिम, योगा, स्विमिंग पूल, मैदाने, बंद केलेले आहेत एका बाजूला हॉटेल्स, मॉल्स पन्नास टक्क्याने सुरू आहेत. खेळाडूंचा सराव महत्त्वाचा आहे. खेळाडू सराव करताना फिटनेस महत्त्वाचा आहे. तर तो करत असतो. एका बाजूला जिथे बंद लावला पाहिजे तेथे न लावता मैदानावरच बंधने का ? असा सवाल त्यांनी केला.