जयसिंगपूरमधील शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह : २० शिक्षक, १२० विद्यार्थी होणार क्वारंटाईन

0
4949

इचलकरंजी (प्रतिनिधी) : जयसिंगपूरमधील एका महाविद्यालयीन शिक्षिका कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील अकरावी, बारावीचे वर्ग आज (सोमवार) पासून बंद ठेवण्यात आले आहेत. तर शाळेतील अन्य शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. उद्या (मंगळवार) २० शिक्षक आणि १२० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन होण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.  

ही संबंधित शिक्षिका कोल्हापूरात वास्तव्यास असून तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली आहे. या शिक्षिकेने शुक्रवार,शनिवार अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेतले होते. पती पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षिकेनेही आपले स्वॅब तपासणीसाठी दिले होते. काल (रविवार) त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शाळेत एकच धावपळ उडाली. तसेच शाळेतील शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर शुक्रवार आणि शनिवारी वर्गात असणाऱ्या अकरावी,बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन विद्यार्थी, पालकांनाही याबाबत कल्पना देऊन त्यांना क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या.

उद्या या विद्यार्थ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जाणार असून पालकांचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.