मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कडक नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच भाग म्हणून कोरोना रुग्ण आढळल्यास कोरोना रुग्णामागे २० ते ३० जणांची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा. चाचण्यांचे प्रमाण वाढवून पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यापेक्षा खाली आणावा, अशा सूचनाही टोपे यांनी दिल्या आहेत.

राज्यात ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येने ५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन ‘एसएमएस’चा म्हणजेच सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा, असे आवाहन टोपे यांनी केले आहे. दरम्यान, राजेश टोपे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.