शिरोळ (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील जि.प. च्या केंद्रीय उर्दू शाळेतील  मुख्याध्यापक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय आज (बुधवार) घेण्यात आला आहे. तर या शाळेतील सर्वच शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे समजले आहे. 

दरम्यान, हे कोरोनाग्रस्त मुख्याध्यापक मिरज येथील असून गेल्या आठ दिवसांपासून ते शाळेत आलेले नव्हते. तरी देखील त्यांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, येथील नगरपरिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य केंद्र यांनी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. मात्र, येथील नगरपरीषदेच्या आरोग्याधिकाऱ्यांना यांना याचे गांभीर्य किती आहे हे कळून येत नाही.

कारण आरोग्याधिकारी हे नवीन असल्यामुळे त्यांना आरोग्य विभागातील अजून कांही जास्त माहिती नाही असे समजते. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. तर कुरुंदवाडमध्ये कोरोना विषयक जनजागृती करण्याची गरज असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे.