कोरोनाचा पुन्हा उद्रेक : पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक

0
42

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : दिल्ली, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला ५० हजारापेक्षाही कमी राहत होती. परंतु काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने लॉकडाऊन केली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. यात लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्री तसेच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. कोरोना लस वाटपासंबंधीचे धोरण, अनेक राज्यांमध्ये नव्याने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या यावर मोदी सलग दोन बैठका घेणार असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या बैठकीत मोदी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. नंतर इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासोबत चर्चा करतील. या बैठकीत कोरोना लस वाटपाच्या धोरणासंबंधीही चर्चा करण्यात येणार आहे.