कोरोनामुळे भाजपची भाषा बदलली : राज्य सरकारच्या मदतीसाठी घेतला मोठा निर्णय

0
133

नागपूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर सर्वच राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. भाजपकडून मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून बुधवार दि. २४ पासून करण्यात येणारे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर यांनी आज (सोमवार) केली.

शेतकऱ्यांच्या आणि वीज ग्राहकांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपाकडून २४ फेब्रुवारीला राज्यव्यापी जेलभरो आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र राज्यात पुन्हा एकदा करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केल्यानुसार हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे नवे आकडे भीतीदायक आहेत. या पार्श्ववभूमीवर सामाजिक जबाबदारीचे भान राखणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजबिलांची वसुली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी २४ फेब्रुवारीला होणारे राज्यव्यापी आंदोलन भाजपाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे आंदोलन स्थगित झाले असले तरी सरकारने या मागण्यांबाबत तातडीची बैठक घेऊन वीज तोडणीला स्थगिती द्यावी, अतिवृष्टी, पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपये एकरी मदत द्यावी इत्यादी मागण्या बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.