कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील ४८ गावातील हेरे सरंजाम वतनाची १६ हजार हेक्टर जमिन यापूर्वीच निर्गत झाली असून त्याचे वर्ग – २ मधून वर्ग – १ मध्ये रुपांतर करण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले. त्यासंदर्भातील सूचना प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत देण्यात आल्या.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हेरे सरंजाम प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित असल्याने तो निकाली काढावा, यासाठी शेतकऱ्यांनी चंदगड येथे उपोषण केले होते. त्यावर आ. राजेश पाटील यांच्या पुढाकाराने या जमिनीचे वर्ग २ मधून वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली होती.

यावेळी जिल्हाधिकारी रेखावर यांनी, चंदगड तालुक्यातील ४८ गावातील हेरे सरंजाम प्रकरणातील १६ हजार हेक्टर जमिन यापूर्वीच निर्गत झाली आहे. परंतु, त्यावरील वर्ग-२ चा शेरा कायम आहे. यासंदर्भात गेल्या वीस वर्षापासून पाठपुरावा सुरु असून या प्रकरणात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. याबाबत येत्या तीन महिन्यात जमिन वर्ग-१ करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, या जमिनी वर्ग- १ करण्यासाठी सर्व तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावचावडीवर जाऊन संबंधित जमिनधारक शेतकऱ्याकडील सर्व जुने रेकॉर्ड तपासून जागेवरच नोटीसा काढून २०० पट रक्कम भरुन घ्याव्यात. या जमिनींचे वर्ग- १ मध्ये रुपांतर करुन घ्यावे, असे आदेश प्रांताधिकारी वाघमोडे यांना दिले. तसेच ६ हजार हेक्टर जमिनीवर कसणारी बेदखल कुळे आहेत. त्या कुळांच्या कागदपत्रांसह पुराव्यांची शहानिशा करुन या जमिनी नावावर कराव्यात, त्यानंतर त्या वर्ग-१ करुन घ्याव्यात असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावर प्रांताधिकारी वाघमोडे यांनी ही संपूर्ण प्रक्रिया दिवाळीनंतर सुरु होणार असल्याचे स्पष्टिकरण दिले.

यावेळी तहसीलदार विनोद रणवरे, संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष गणेश फाटक, अॅड. एस.एस. खोत, राजेंद्र कापसे, धोंडिबा चिमणे, रणजीत गावडे, अभय देसाई, महादेव प्रसादे, अनिल रेंगडे, महादेव मंडलिक, रवी नाईक आदी उपस्थित होते.