कोल्हापुरात सोमवारी ‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेचे अधिवेशन

0
15

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये दि. २८ नोव्हेंबर रोजी होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. या अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हसन मुश्रीफ, आ. प्रकाश आबिटकर, आ. जयंत आसगावकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘कास्ट्राईब’ ही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणारी संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून विविध खात्यातील लाखो मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची निर्गत केली आहे. महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीतील आरक्षण स्थगित केल्याने अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. यासाठी संघटनेने शासन दरबारी अनेक माध्यमातून आवाज उठविला आहे.

या अधिवेशनामध्ये महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध जिल्हयातील मागासवर्गीय प्रवर्गातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी १२ वर्षांपासून कोल्हापूर जिल्हयामध्ये ‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेच्या वतीने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आता याचे स्वरूप राज्यव्यापी व्हावे, यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

दर्जेदार शिक्षण हे तळागाळातील समाजापर्यंत पोहचावे, शिक्षणाचे सार्वत्रिकरण झाले पाहिजे व राज्यातील सर्व शाळांना अनुदान व पायाभूत सुविधा देणे, गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल स्कूल उपक्रम राबविणे हा ‘कास्ट्राईब’ शिक्षक संघटनेच्या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षण वाचवा नागरी कृती समिती अभियानचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे, शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे हे अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

या पत्रकार परिषदेस नामदेवराव कांबळे (महासचिव), गौतम वर्धन (जिल्हाध्यक्ष), संजय कुडूकर (जिल्हा सरचिटणीस), पी. डी. सरदेसाई (कोषाध्यक्ष), तुकाराम संघवी (कार्याध्यक्ष), वसंत देसाई (उपाध्यक्ष), तानाजी घस्ते, यशवंत सरदेसाई, ए.एल. कांबळे,  अशोक कांबळे, डी. के. कांबळे, डी. एस. कौसल, आकाराम कांबळे, राहुल तारळेकर, सहदेव कांबळे, बी. जे. गाकयवाड, दिनकर जगदीश, विजय कांबळे आदी संघटनेचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.