वाढीव वीजबिलावरून वादंग

0
56

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना आजाराच्या महामारीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केले. या काळात आलेल्या वाढीव वीजबिलात सवलत मिळावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. याउलट मीटरप्रमाणे आलेली बिले भरावी लागतील, अशी भूमिका सरकारने घेतली आहे. याच प्रश्नावरून राज्यातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. परिणामी यावरून वादंग निर्माण झाले आहे.

लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरी राहिले. नोकरी, व्यवसाय बंद राहिले. कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न घटल्याने वाढीव वीज बिल कसे भरायचे ? असा प्रश्न सामान्य, गरीब कुटुंबांना सतावत आहे. लॉकडाऊनमुळे दोनवेळच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झालेला असताना वाढीव विजेचे बिल भरणे त्यांना अशक्य झाले. म्हणूनच ते वाढीव बिलातून सवलत मिळावी, अशी मागणी करत आहेत. पण लॉकडाऊनच्या काळात विजेचा वापर वाढल्याने बिल वाढीव आले आहे, असे वीज वितरण कंपनीचे प्रशासन सांगत वसुली मोहीम राबवत आहे. याला ठिकठिकाणी विरोध होत आहे. विरोधी राजकीय पक्षासह संघटनाही विरोधात सक्रिय झाल्या आहेत.

दरम्यान, सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही, मीटरप्रमाणे आलेली बिले भरावीच लागतील, असे वक्तव्य केले. यामुळे पुन्हा वीज ग्राहकांत संतापाची लाट उसळली. महाविकास आघाडी सरकारने वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन दिले असताना आता उलटी भूमिका का, असा प्रश्न विरोधकही विचारत आहेत. यावरून आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी १ हजार कोटी दिले जातात, तर वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी निधी का दिला जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेस पक्षाकडे ऊर्जा खाते असल्याने वीज बिलाच्या सवलतीपोटीचा निधी मिळत नाही, असाही सूर उमटू लागला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनीही ही नाराजी व्यक्त केली. याच मुद्यावरून आघाडीत बिघाडी होणार का, अशीही राजकीय चर्चा रंगली आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी खुलासा करून निधी वाटपात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला जात नाही. कोरोनामुळे निधीची टंचाई आहे. त्यामुळे सर्व खात्यांना समान निधी देण्यात मर्यादा येत आहेत, असे शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते सांगत सारवासारव करत आहेत. दरम्यान, ग्राहकांना मात्र वाढीव वीज बिलातून किती सवलत मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.