कोल्हापूर (प्रतिनिधी) : अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रकानुसार कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी करावी. ज्या तालुक्याला ज्या ठिकाणी नियुक्ती मिळाली असेल, त्याचठिकाणी उमेदवारांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

अंशकालीन उमेदवारांबाबत शासन परिपत्रक २ मार्च २०१९ व ३० सप्टेंबर २०२० आणि १७ जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार कंत्राटी रिक्त पदे भरतीबाबत अंमलबजावणी व रिक्त पदांच्या माहितीबाबत आज (बुधवार) आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, तहसीलदार रंजना बिचकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजाता शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई यांनी विभागनिहाय रिक्त पदे आणि भरतीबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, विभाग प्रमुखांनी रिक्त पदे भरताना अंशकालीन पदवीधर उमेदवारांमधून कंत्राटी पदे भरावीत. त्याबाबत पत्रव्यवहार करावा. ठेकेदारामार्फत पदे न भरता अंशकालीन पदवीधर उमेदवारांमधून पद भरती करण्याबाबत एसएससी मंडळाला पत्रव्यवहार करावा. कंत्राटी पदे ही  बदलता येण्याजोगी नसल्याने ज्या ठिकाणी नियुक्ती मिळेल, त्याच ठिकाणी त्यांनीही काम करावे. विभागांनीही भरतीप्रक्रिया राबवताना जो उमेदवार नियुक्त केल्यानंतर हजर होत नसेल अथवा नाकारत असेल, तर त्यास काळ्या यादीत टाकावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.