जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखी तीन वर्गांची लवकरच उभारणी : महापौर

0
41

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेसाठी आणखीन 3 वर्गखोल्यांची लवकरच उभारणी केली जाईल, असे प्रतिपादन महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. आज जरगनगर येथील जरग विद्यामंदिर शाळेस महापौर सौ. निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते

महापौर म्हणाल्या की, श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर शाळेसाठी जादा वर्गांची गरज लक्षात घेऊन आणखीन 3 वर्गखोल्या बांधून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.  यामध्ये 1 वर्गखोली महापालिकेमार्फत तर 2 वर्ग खोल्या आमदारांचा स्थानिक विकास निधीमधून उभारण्याबाबत निश्चितपणे कार्यवाही करु. या शाळेसाठी असलेल्या मैदानाचे सपाटीकरणाचे कामही लोकसहभागातून हाती घेण्याबाबतही पुढाकार घेऊ. महापालिकेच्या शाळा अधिक दर्जेदार आणि गुणवत्ताप्रधान करण्यावर अधिक भर दिला असून यापुढील काळातही महापालिकेच्या शाळा महापालिका आणि लोकसहभागातून अधिक दर्जेदार बनविण्यात पुढकार घेतला जाईल.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, जरग विद्यामंदिर शाळेची वर्ग खोल्याची गरज विचारात घेऊन प्राधान्याने 3 खोल्या महापालिका आणि स्थानिक विकास निधीतून उभारण्याचा प्रयत्न राहील. महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या एका वर्गखोलीच्या उभारणीचा प्रस्ताव तात्काळ देण्याचे आदेशही त्यांनी अभियंत्यांना यावेळी दिले. उर्वरित वर्गखोल्या उभारणीसाठी पालकमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच मैदान सपाटीकरणाचे कामही लोकसहभागातून केले जाईल, असे सांगितले. याठिकाणी जिजाबाई गर्ल्स हायस्कूल स्थलांतरणाबाबतही कार्यवाही प्राधान्याने करावी, अशी सूचना केली. तर या शाळेत आपण स्वत: 15 दिवसातून एक तास गणित विषय शिकणार असल्याचेही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.

यावेळी नगरसेवक अशोक जाधव, नगरसेविका गीता गुरव, अशोक पोवार, रमेश मोरे आदि मान्यवरांनी शाळेच्या विकासाबाबत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास कनिष्ट अभियंता नेर्लीकर, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here