मुंबई (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देऊन गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या  कालावधीत राबविण्यात आला. त्यास चांगले यश मिळाले. प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांमधून अभियान कालावधीत राज्यात ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले.  त्यापैकी ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.  तर ४ लाख ४० हजार ९२४ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे,  अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की,  या अभियानास १ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  अभियान कालावधीत ४२ हजार ६५७ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा दिली  आहे. तर उर्वरित ६३ हजार ३४३ भूमीहीन लाभार्थ्यांना जागा देण्याची प्रक्रिया सुरु आहे. ३ लाख ८५ हजार ५१८ लाभार्थ्यांच्या घरकुलांना नव्याने मंजूरी दिली. तसेच  आजअखेर ६ हजार १६५ गवंडी प्रशिक्षीत करण्यात आले असून १५ हजार ८५५ गवंडी प्रशिक्षण प्रगतीपथावर आहे.

लाभार्थ्यांना आदर्श घरकुलांबाबतची माहिती देण्यासाठी आतापर्यंत २१० डेमो हाउसेसची कामे सुरु असून त्यापैकी ३० डेमो हाउस बांधून पूर्ण झाली आहेत. पुरेशी जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी बहुमजली इमारती निर्माण करण्यात येत आहेत. आजअखेर ९२१ बहुमजली इमारतींची (जी+2)  निर्मिती केली आहे. ३४३ तालुक्यांमध्ये घरकुल मार्ट उभारले आहे. घरकुल बांधकामासाठी बँकेकडून ७० हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे.  मूलभूत सुविधांद्वारे १९ हजार ३०१ आदर्श घरकुलांची उभारणी अभियान कालावधीत केल्याची त्यांनी सांगितले.  महाआवास अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन यशस्वी करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.