भाजपकडून शिवसेनेत फाटाफूट करण्याचे कारस्थान : संजय राऊत

0
169

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत ताबा मिळवण्यासाठी शिवसेनेत फाटाफूट करण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू आहे. याचे भाकीत यापूर्वीही आम्ही केलेले आहे. शिवसेनेमध्ये आईचा दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वत:ला विकणारे, महाराष्ट्राच्या पाठिंत खंजीर खुपसणारी औलाद शिवसेनेत कधीच निर्माण होणार नाही, अशी खोचक टीका संजय राऊतांनी भाजपवर केली.

एकनाथ शिंदे देखील मुंबईच्या बाहेर असून, त्यांच्याशी देखील संपर्क झालेला आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राऊत म्हणाले की, ज्या प्रकारचे राजकीय चित्र राज्यात निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. ते आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू,

महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचे सरकार पाडावे, अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण हे महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करण्याचे कारस्थान आहे. काही मंत्र्यांशी संपर्क झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे आणण्यात आल्याचे सांगितले आहे. ते आमदार गुजरात आणि सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपाचे अध्यक्ष करत आहे, असे संजय राऊत म्हणाले.