मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ८४ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने कोर्टात सादर केला. हा रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला असल्याने पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चंद्रकांत पटेल यांच्याशी संबंधित पुष्पक बुलियनवरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपात हे प्रकरण समोर आले होते. नोटाबंदीच्या काळात बुलियन कंपनी आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यात झालेले काही व्यवहार चौकशीच्या रडारवर होते. तब्बल ८४.६ कोटींच्या नोटा पुष्पक बुलियनच्या विविध खात्यांत जमा करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर यातून सोने खरेदी करून हा काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याच खात्यातील काही रक्कम श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीत वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. याच पैशातून कंपनीमार्फत पाटणकर यांनी ठाण्यातील निलांबरी सोसायटीत ११ सदनिका विकत घेतल्याचा आरोप करत सीबीआयने साडेसहा कोटींची ही मालमत्ता जप्त केली होती.

याप्रकरणी तपासाअंती आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सापडत नसल्याने हा तपास बंद करत असल्याचा अहवाल सीबीआयच्या वतीने कोर्टात सादर करण्यात आला. या रिपोर्टला ईडीने विरोध केला होता. आमचाही तपास याच दिशेने सुरू असल्यामुळे हा रिपोर्ट स्वीकारल्यास आमच्या तपासावरही थेट परिणाम होईल असा दावा करण्यात आला.

मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एस सय्यद यांनी हा दावा फेटाळून लावला. यापूर्वी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये काही त्रुटी होत्या, त्यामुळे आम्ही तो अमान्य केला होता. मात्र आता आमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तपासयंत्रणेने दिली आहेत, त्यामुळे दोघांनी एकाच प्रकरणाचा तपास करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.