मुंबई (प्रतिनिधी) : पुणे येथील भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील आरोपी माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर याआधी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही याच प्रकरणात जामीन मिळाला आहे.

मंदाकिनी खडसे यांची १९ ऑक्टोबररोजी ईडीकडून चौकशी केली होती. भोसरी येथील जमीन कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मंदाकिनी खडसेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी खडसे यांना महसूल मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी भाजप सोडताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.