गगनबावडा (प्रतिनिधी) : स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींना चांगल्या संधी असून, तरुणाईने परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य, परिश्रम व उमेद बाळगल्यास यश नक्की मिळते. तरुणांनी नवे विचार व संकल्पनेच्या जोरावर जीवनात वाटचाल करावी, असे प्रतिपादन जि.प. चे माजी सदस्य डॉ. भगवान पाटील यांनी केले.
तिसंगी (ता. गगनबावडा) येथे बापू चॅरिटेबल ट्रस्ट व कामधेनू विकास सेवा संस्था यांच्या वतीने गगनबावडा तालुक्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये व पोलीस भरतीमध्ये यश मिळवलेल्या तरुण-तरुणींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास गगनबावड्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस भरतमध्ये यश मिळवलेले सलमान फकीर (तिसंगी), महेश भोसले (मणदूर), गुरुप्रसाद पाटील (मुटकेश्वर), स्वप्नील पाटील (मणदूर), अंजली तिसंगीकर (तिसंगी), ऋतुजा गावडे (किरवे), गौरी मोळे (साखरी) यांचा, तसेच तिसंगी ग्रामपंचायत नूतन सदस्यपदी निवड झालेल्या भारती पाटील व संपत सूर्यवंशी याचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सचिन पोतदार यांनी केले. ट्रस्टच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, मा. सरपंच मधुकर पोतदार, संजय खाडे, प्रकाश मोरे, बाबासो भोसले, यशवंत कांबळे उपस्थित होते.