कृषी कायद्या विरोधात गुरुवारी काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली….

0
85

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  केंद्र सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात उद्या (गुरुवार) जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे ७०० ते ८०० ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी होणार आहेत. राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात होणार असून प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. ही रॅलीला निर्माण चौक येथून सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे.

कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेसने संघर्ष पुकारला असून नुकताच १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन केले होते.

या कृषी कायद्यांविरोधात उद्या जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. निर्माण चौक येथून सुरुवात होणाऱ्या या रॅलीचे सांगता दसरा चौक येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष आणि विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.