पुणे (प्रतिनिधी) : दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी सहा गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याचा भर दिवसा खून केला. आज (सोमवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा चौकात ही घटना  घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. समीर मनूर (अंदाजे वय ३०) असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नांव आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी  झाली. समीर हा चहा पिण्यासाठी चंद्रभागा चौकात आला असता दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यात समीरचा जागीच मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

समीर मनूर यांची काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झाली आहे. आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.